राजेंद्र जैन/ कडा- प्रत्येक शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे मुलभूत प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. कडा येथे शनिवारी भारतीय जनता पार्टी आयोजित जनसंपर्क अभियान व व्यापारी संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना आ धस म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी वर्गाच्या समस्या व मुलभूत प्रश्न जाणून घेण्यासाठी संपूर्ण देशभरात वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या जनसंपर्क अभियानांतर्गत गावागावात जाऊन समाजातील प्रमुख घटकांशी संवाद साधून नागरिकांच्या मुलभूत समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असून, या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आ. धस यांनी शनिवारी कडा शहरातील नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, दुकानदार यांच्याशी मनमोकळा संवाद साधून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत ग्वाही दिली. तसेच बाजार समितीमधील रस्ता, लिलावगृह, सौचालयाचे काम लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगून प्रत्येक बाजार समितीत शेतकरी भवन उभारण्याची राज्य सरकारची संकल्पना आहे. त्यासंदर्भात त्वरित पाठपुरावा करण्यासाठी कृषी उत्पन्र बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, सह इतर पदाधिका-यांना यावेळी सुचना केल्या आहेत.
- व्यापा-यांसाठी गृहमंत्र्यांना भेटणार..आमदारांसमोरच सराफ दुकानदारांनी बाहेरून येणा-या पोलिसांकडून आम्हाला सतत आर्थिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचे गा-हाणे मांडले असून, या प्रश्नाबाबत आपण सराफ असोशिएशनच्या पदाधिका-यांना सोबत घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची ग्वाही देत आ. धस यांनी व्यापा-यांना मोठा दिलासा दिला आहे.
कडा शहराची बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे याठिकाणी बाहेरुन येणा-या शेतकरी, व्यापारी व बाजारकरुंची गैरसोय होऊ नये, म्हणून कडा शहरात पन्नास लक्ष रुपये खर्चुन दोन फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे धस म्हणाले. यावेळी सराफ दुकानदारांनी बाहेरील पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल धसांसमोर आपले गा-हाणे मांडले. त्या संदर्भात बोलताना धस म्हणाले की, सराफ व्यापारी असोशिएशनच्या प्रमुख पदाधिका-यांना सोबत घेऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याचा व्यापा-यांना शब्द दिला. तसेच आष्टीत काही अधिकारी आमचं कुणी काहीच वाकडं करु शकत नाही. अशाच अविर्भावात वागतात. सर्वसामान्य नागरीकांना कामासाठी पैशाची मागणी करुन अडवणूक करतात. अशा कुठलाही अधिकारी असो किंवा कर्मचा-याची यापुढे गय गेली जाणार नसल्याचे धस यांनी सांगीतले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया, माजी सभापती संजय ढोबळे, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, सरपंचपूत्र युवराज पाटील, संचालक योगेश भंडारी, संजय मेहेर, व्यापारी संघटनेचे नागेश कर्डीले, बिपीन भंडारी, हेमंत पोखरणा, गोकुळदास मेहेर, डाॅक्टर असोशिएशनचे डाॅ. पंडीत खिलारे, डाॅ. उमेश गांधी, डाॅ. अनिल मुरडे, डाॅ. प्रताप मार्कंडे, राम मधूरकर, बबलू तांबोळी, राम ससाणे, रमेश गुगळे, सचिव हनुमंत गळगटे, विजय वेदपाठक, गणेश शिंदे, सुमित भंडारी, दिलिप पटवा, अशोक पवार, माऊली जरांगे आदी मान्यवरांसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments