रेशनिंगच्या तांदळाच्या ६०० गोण्या पकडल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


कडा - एका मालट्रकमध्ये रेशनिंगचा ६०० गोण्या तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. नगर- जामखेड रोडवरील कॅण्टोन्मेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्यावर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. ६ लाख ४५ हजारांचा तांदूळ व ट्रक असा मुद्देमाल जप्त केला आहे.

कृष्णा गोविंद ढाकणे (वय ३१) व विवेक रामभाऊ ढाकणे (वय १९, दोघे रा. धनगरवाड़ी, जि. बीड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रकाश धनराज तोतला व पवन प्रकाश तोतला (दोघे रा. वंजारगल्ली, जि. बीड) हे दोघे फरार आहेत.बीड येथील प्रकाश तोतला हा बीडहून मुंबईला एका ट्रकमधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात आली.

पोलीस पथकाने नगर-जामखेड रोडवर कॅण्टोन्मेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्यावर सापळा लावला असता त्यांना ट्रक येताना दिसला. पथकाने त्याला थांबवून चालकाचे नाव विचारले असता त्याने कृष्णा ढाकणे व विवेक ढाकणे असे असल्याचे सांगितले. दरम्यान, ट्रकमधील तांदूळ प्रकाश तोतला व पवन तोतला यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. तांदूळ बीड एमआयडीसी येथील महेश गृहउद्योग येथून आणला असून, शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील ५० किलो वजनाच्या ६०० गोण्या तांदूळ दुसऱ्या इतर गोण्यांमध्ये पलटी मारून विनापरवाना मुंबई येथे विक्रीकरिता घेऊन जात असल्याची कबुली त्या दोघांनी दिली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, सचिन आडबल व रणजित जाधव यांनी केली.

बीड जिल्ह्यातही उत्कृष्ट कामगिरी …. 

दिनेश आहेर यांनी बीड जिल्ह्यात अनेकदा धडाकेबाज कारवाया करुन कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. आष्टी येथील पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना दिनेश आहेर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. ते सध्या नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक मोठ- मोठे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांच्या नाकात दम आणला आहे.

 

Post a Comment

0 Comments