सडकछाप मजनूंचा पोलिसांकडून धोबीपछाड पाहुणचार !

कडा / वार्ताहार - ग्रामीण भागातून शिक्षणासाठी कड्यात येणा-या मुलींच्या पाठीमागे ट्रिपलसीट धावणा-या सडकछाप मजनूंना थेट रस्त्यावरच उठबशा काढायला लावून पोलिसांनी यथेच्छ पाहुणचार करुन माज उतरला आहे. या पोलिसांच्या कारवाईचे पालकांसह नागरीकांनी जोरदार स्वागत केले आहे.

कडा शहरात ग्रामीण भागातून शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी येणा-या मुलींची संख्या मोठी आहे. शाळा, महाविद्यालयासह शिकवणी वर्गाकडे ये-जा करताना मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढला असून, दुचाकीवरून रस्त्यावर ट्रीपलसीट हिरोगिरी करणारे सडकछाप मजनू मुलींना त्रास देतात. त्यामुळे शहरातील रस्त्यावरची टगेगिरी अक्षरश: डोकेदुखी बनली आहे. छेडछाडीचा हा त्रास घरी सांगावा तर शिक्षण बंद, रस्त्यावर विरोध करावा तर दडपण, यामुळे मुली तोंड दाबून सतत बुक्क्यांचा मार सहन करीत असंत. हीच बाब सपोनि विजय देशमुख यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे मुलींच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी कड्यात पोलिस यंत्रणा सक्रीय झाली आहे. पोलिसांनी अचानक रस्त्यावर उतरून सडकछाप मजनूंचा यथेच्छ सरकारी पाहुणचार केला. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात ट्रीपलसीट घिरट्छया घालणा-यांना भररस्त्यावर उठबशा काढायला लावून पोलिसांनी काहींची चांगलीच मस्ती जिरवली. त्यामुळे टगेगिरी करणा-या सख्याहरिंची चांगलीच भंबेरी उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या कारवाईचे पालकांसह शिक्षकांनी जोरदार स्वागत केले. पीएसआय प्रमोद काळे. पो. ना. हनुमंत बांगर, दीपक भोजे, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांनी थेट रस्त्यावर उतरुन टगेगिरीचा माज उतरवला आहे.  

.... तर दंडात्मक कारवाई !

कडा परिसरात मोकाट तरुणांची टगेगिरी वाढली असून, मुलींच्या छेडछाडीचा हा प्रकार पोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेतल्याने सडकछाप मजनूंची भंबेरी उडाली आहे. यापुढे पोलिस साध्या गणवेशात सार्वजनिक ठिकाणी किंवा चौकाचौकात नजर ठेवणार असून, पालकांनी देखील अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी वाहने देऊ नयेत.नसता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे सपोनि विजय देशमुख,यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments