८५ हजारांचा सापडलेला लॅपटॉप केला मूळ मालकाला परत !

पाथर्डी – तालुक्यात चोरी,फसवणूक,रस्ता लुटीच्या घटना वारंवार घडत असताना पाथर्डीतील उद्योजक इरफान यासीन पठाण यांनी प्रमाणिकपणाने राहुरी बस स्थानकातून ओमकार चौधरी या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचे हरवलेले ८५ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप,मोबाईल संच परत करून इरफानने प्रामाणिकपणाचा आदर्श उदाहरण उभे केले आहे.

राहता येथील रहिवासी ओमकार चौधरी हा अभियांत्रिकी शाखेत पुणे येथे शिक्षण घेत असून त्याने त्यांच्या शैक्षणिक कामासाठी ८५ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप विकत घेतले होते मात्र प्रवासादरम्यान राहुरी बस स्थानकात अज्ञात चोरट्यांनी ओमकार चौधरी यांचा लॅपटॉप,मोबाईल  व शैक्षणिक साहित्य असलेल्या दोन पिशव्या पळवल्या होत्या,सर्वत्र शोधाशोध घेवूनही चोरी गेलेल्या सामानाचा शोध लागत नसल्याने ओमकार व त्यांचे कुटुंबीय व्यथित झाले होते.

अश्यातच पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील रहिवासी तथा सोलर पंप व्यावसायिक तथा अभियंता इरफान यासीन पठाण यांना काही अज्ञात लोक रस्त्यावर लॅपटॉप व शैक्षणिक साहित्य असलेली पिशवी किरकोळ किमतीला विक्री करत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे संशय आल्याने इरफान यांनी सदरील लॅपटॉप तपासला असता त्यामध्ये ओमकार चौधरी यांचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आढळून आले त्यामुळे अभियंता इरफान पठाण यांनी गांभीर्य ओळखून तात्काळ सदरील अज्ञात लोकांकडून सदरचे लॅपटॉप व मोबाईल तसेच शैक्षणिक साहित्य असलेली पिशवी विकत घेतली व पाथर्डी पोलिसांना याबाबत लागलीच कल्पना दिली व इरफानने स्वतः ओमकार चौधरी यांच्या पत्त्यावर संपर्क केला असता लॅपटॉप व मोबाईल बाबत मूळ मालकाची खात्री झाल्या नंतर ओमकार चौधरी यांच्या पालका कडे सदरील लॅपटॉप,मोबाईल व पिशवी मंगळवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्या हस्ते इरफानने ओमकार चौधरी यांच्या वडिलांकडे परत दिली. यावेळी सहाय्यक फौजदार नितीन दराडे,सामाजिक कार्यकर्ते अॅड.हरिहर गर्जे,भागवत नरोटे,हारून मनियार आदी उपस्थित होते. 

पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील सामान्य कुटुंबातील इरफान याचे बी.ई.कॉम्प्युटर व एम.बी.ए. पर्यंत शिक्षण झाले असून सध्या तो सोलर ठेकेदारिचा व्यवसाय करतो तसेच तो सेवाभावी वृत्तीने पाथर्डी शहरातील खासगी शाळेत विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देखील देत आहे. इरफानच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments