पाथर्डी (दुर्गा भगत) - एक दोन दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीने मला एक व्हिडिओ शेअर केला तेव्हा तो
व्हिडिओ पाहून वाटले की खरचं हा विषय फार गंभीर आणि खूप महत्त्वाचा आहे.तुम्हाला
ही वरील हेडिंग वाचून वाटलं असेल की, खरचं
आपल्याला अजून थोड हवं आहे. तर थोडं नाही तर खूप काही हवं आहे. आणि काय काय हवं
आहे ही लिस्ट तयार करायला घेतल्यावर ती काही लवकर नक्कीच संपणार नाही. काही वेळ
विचार करून पहा..
प्रत्येक स्त्री कडे कपड्यांनी खच्चून भरलेले
कपाट असेल तरीही आपल्याकडे एखाद्या कार्यक्रमासाठी चांगली साडी नाही,कुठे फॅमिली सोबत फिरायला जायचंय असेल तर माझ्या कडे चांगला
ड्रेस नाही असे म्हणतो, आपल्याला गाडी हवी, बंगला हवा, लक्झरी लाईफ हवी.मुलांच्या भविष्यासाठी,
त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमी राहायला नको म्हणून भरपूर बँक
बॅलन्स हवाय. कारण हे दुसऱ्याकडे आहे मला ही हवंय हा विचार आपण करतो, सध्या थोड आहे अजून थोड हवं आहे असं आपण म्हणतो. आपण कुठे मार्केट मध्ये
सहज जरी गेलोत तरी काही ना काही घेऊनच घरी येतोत मग ते उपयोगी येवो अथवा न येवो,
आणल्यानंतर ते कुठेही पडो पण आणताना आपण विचार करत नाही की खरंच हे
हवंय का? याची गरज आहे का? हे उपयोगात
येईल का? की ते दुसऱ्या कोणाकडे आहे म्हणून आपल्याला हवंय
आपण संपूर्ण आयुष्यभर हेच म्हणणार की मला हे हवंय, ते हवंय,
अमुक हवंय, तमुक हवंय, फक्त
हवंय हवंय आणि हवंय..
पण कधी तरी हा ही विचार करा की, आपल्याला खरंच हवंय का? आपल्याकडे काहीच
नाही का? आपल्याला खरंच या गोष्टीची गरज आहे का? सर्व असून ही आणखी हवंय का? आणि अजून अजून म्हणता
म्हणता जे महत्त्वाचं आहे त्याकडे आपण लक्ष देत नाही. पण जे असण्याने किंवा
नसण्याने काहीच फरक पडत नाही त्या गोष्टींना आपण महत्वाचं मानतो, त्यासाठी आपण झटतो, लढतो, प्रयत्न
करतो. यामध्ये आपला अती हव्यास आडवा येतो, लोभी वृत्ती आडवी
येते. दुसऱ्याकडे आहे म्हणून माझ्याकडे असावी अशी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण
होते. आणि ज्याची गरज नाही त्यासाठी आपण झटतो. आयुष्य जगत असताना आपण आपली तुलना
इतरांशी करतो. क्षणोक्षणी आपण स्वतःला कमी लेखतो,आणि हे फक्त
पैशाच्या बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीत घडतं मग ते सौंदर्याच्या बाबतीत असेल,
शरीरयष्टीच्या बाबतीत असेल ,एखाद्याचे
स्वभावाच्या बाबतीत असेल किंवा एखाद्याच्या लठ्ठ पगाराची नोकरी असेल... आपण नेहमी
दुसऱ्याशी तुलना करतो, आणि ती मुद्दामून करतो असे नाही तर
आपल्या स्वभावाची एक प्रकारची ती सवयच झालेली असते यामुळे आपल्यात न्यूनगड निर्माण
होतो त्यामुळे आपण इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखतो.
पण आपण स्वतःला कमी का लेखावे, काय कमी आहे आपल्यात. आणि मुळात आज ज्या व्यक्तीबरोबर आपण
तुलना करतोय ती व्यक्ती इथपर्यंत सहज पोहचली असेल का? त्या
व्यक्तीने किती मेहनत घेतली असेल, किती कष्ट केले असतील,
किती हलापेष्टा सहन केल्या असतील किती दुःख, यातना
सहन केल्या असतील याचा विचार आपण करत नाही. ते मला हवंय ,हे
मला हवंय या विचारात आपण आपला आयुष्य घालवतो. पण यामध्ये महत्वाची गोष्ट आहे,
कोणीच कोणाच्या पुढे नाही आणि कोणीच कोणाच्या मागे नाही.
आपल्या वेळेनुसार आणि आपण केलेल्या कष्टानुसार त्या गोष्टी योग्य त्या वेळेवर मिळत असते. पण त्यासाठी फक्त दुसऱ्यांकडे पाहत बसणे योग्य नाही ,तुलना करणे योग्य नाही तर त्यासाठी आपण मेहनत घेणे योग्य आहे. आणि जे मिळाले त्या गोष्टीत समाधानी,सुखी,शांत राहणे गरजेचे आहे. जर आपण समाधानी असू तर त्या गोष्टीचा आनंद आहे, म्हणून मन जर समाधानी असेल तर आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यातच आपण आनंदी असतो. आपण आपली तुलना इतरांशी किंवा दुसऱ्याची तुलना आपल्याशी करणार नाही. आपण आपली तुलना स्वतःशी करावी स्वतःबद्दल करावी. स्वतःचे मन सकारात्मक करावे . विचार आपोआप सकारात्मक होतील. स्वतःचे मन सकारात्मक आणि शांत असावे. मग नक्कीच आपण एक समाधानी सुखी जीवन जगू..म्हणूनच मला वाटतं "थोडा है और थोडी की जरूरत...नही है,जो है वही जिंदगी के लिए काफी है"असं म्हणा आणि जीवन जगा नक्कीच आपण आपल्या आयुष्यात आनंदी असू- लेखिका दुर्गा भगत {Hsc.D.ed, M.A.(His & Eco) B.ed ,DSM}
0 Comments