कडा - मणिपूरमध्ये जमावाकडून दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढून सामूहिक बलात्काराच्या संतापजनक घटनेचा आष्टीत अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिका-यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार दि.२५ रोजी आष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावर उतरून मणिपूर येथील माणुसकीला काळीमा फासणा-या निंदनीय घटनेचा निषेध केला. या संदर्भात आष्टीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वाघमारे यांना निवेदन देऊन या घटनेतील दोषींना मृत्यू दंडाची कठोर शिक्षा देण्यात यावी.
तसेच तेथील सरकार बरखास्त करण्यात यावे. अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने महिलांनी एकत्र येऊन एकात्मिक बालविकास कार्यालयापासून हातात निषेधाचे फलक घेऊन आष्टी शहरातून रॅली काढून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी प्रा गनीभाई तांबोळी, नसीम सय्यद, आशा शेंडगे, शोभा साठे, उषा राऊत, रत्नमाला लाहोर, आशा वखरे, अलका सानप,रामकवर भोगाडे, संगीता गरुड, सुशीला बांगर, मथुरा कुत्तरवाडे, रेश्मा चौधरी, वैशाली सुंबरे, सविता थोरवे, बेबी बेग, कुसुम थोरवे यांच्यासह तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका निषेध रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
0 Comments