आष्टीचे पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांचा विशेष गौरव !


कडा / वार्ताहर - स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मोठी जोखीम पत्कारुन असंख्य गंभीर गुन्ह्यात पोलिसांना सतत गुंगारा देणारा फरार कुख्यात दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसलेला घातक शस्त्रासह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळून गजाआड केल्याबद्दल आष्टीचे पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्यासह त्यांच्या टीममधील बहाद्दर पोलीस कर्मचा-यांचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी प्रशस्तीपत्र प्रदान करुन झालेला हा विशेष सन्मान ख-या अर्थाने आष्टीकरांची मान अभिमानाने उंचवणारा ठरला आहे. 

आष्टी पोलिस ठाण्याचा पद्भार स्वीकारताच, पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी अवघ्या एका महिन्यातच पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे. तत्कालिन पोलिस निरिक्षक दिनेश आहेर, सय्यद शौकतअली यांच्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात साहसी कारवाया करणारा एक खमक्या पोलिस अधिकारी म्हणून संतोष खेतमाळस यांचा आवर्जून नामोल्लेख होत आहे. पोनि. खेतमाळस यांनी गोंदीया सारख्या जोखमीच्या नक्षली भागातही साहसी कामगिरी केली आहे. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या गजाआड करुन पोलिस दलात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अनेकदा त्यांचा वरिष्ठांकडून गौरव झाला आहे. यापुर्वी खेतमाळस यांनी पुणे शहरात सहा वर्षे, पुणे ग्रामीणमध्ये साडेतीन वर्षे तर छत्रपती संभाजीनगर येथे चार वर्षे उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पोलिस प्रशासनातील कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पुणे डिटेक्शन {डिबी} विभागात सहा वर्षे कर्तव्य बजावून आपल्या कर्तृत्वाचा अनोखा ठसा उमटविला. याच पोलिस दलातील सर्वोत्कृष्ट कार्याची पावती म्हणून वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून त्यांना विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक यासह आतापर्यंत खेतमाळस यांना दोनशे पन्नासहून अधिक पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आलेले आहे. असा सन्मानपात्र पोलिस अधिकारी आष्टीसारख्या ग्रामीण पोलिस ठाण्याला लाभणे, हीच बाब सर्वसामान्य नागरीकांसाठी अभिमानास्पद असल्याचे बोलले जात आहे.

कुठलेही यश कुणा एकट्याचे नसते. एखादी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित केलेले प्रयत्न, यालाच सांघिक यश म्हणतात. सदरील कामगिरी ही पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर तसेच माझ्या सहका-यांनी प्राणाची बाजी लावून केलेल्या कामाचे प्रतिक आहे असे संतोष खेतमाळस, पोलिस निरिक्षक आष्टी यांनी बोलताना यावेळी सांगितले. 

Post a Comment

0 Comments