अज्ञात पिकप वाहनाने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू

कडा - कर्जत तालुक्यातील दांम्पत्य स्विप्ट कारने पाथर्डीकडे जात असतानाच, कारमधील महिलेला उलटी होऊ लागल्याने सदर महिला कारमधून उतरत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात पिकप वाहनाने धडक दिली. या अपघातात पोलिस पत्नीचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास पाथर्डी रोडलगत खरकटवाडी फाट्याजवळ घडली. भावना सागर जंगम (वय-२८) रा. राहुरी, ह.मु. कर्जत (नगर ) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील कर्जत येथील उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी सागर जंगम व पत्नी भावना जंगम हे दांम्पत्य स्विप्ट कारने कडा - पाथर्डी मार्गावरुन खाजगी कामासाठी जात होते. कड्याकडून पाथर्डीकडे जात असताना धामणगाव परिसरातील खरकटवाडी परिसरात कारमधील महिलेला अचानक उलटी होऊ लागली. त्यामुळे चालक पतीने स्विप्ट कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. दरम्यान सदर महिला कारमधून उतरत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात पिकप वाहनाने महिलेला जोराची धडक दिली. या अपघातात पोलीस पत्नी भावना जंगम यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या अपघाताची माहिती प्राप्त होताच, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, कर्जतचे पोलीस अधिकारी वाघारे, अंभो-याचे एपीआय महादेव ढाकणे, अंमलदार बाबु तांदळे, महिला पोलिस नाईक सुवर्णा पालवे, पोकाॅ शिवदास केदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला त्वरीत दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली. मयत महिलेवर कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. निरपराध पोलिस पत्नीला धडक देऊन पोबारा करणा-या अज्ञात पिकप वाहनचालकाचा अंभोरा पोलिस शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments