अबब ! शालेय मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत सोनकिडे !

 


राजेंद्र जैन / कडा - शहरातील नामांकित जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेच्या मध्यान्ह भोजनासाठी शिजवेल्या खिचडीत चक्क सोनकिडे आढळून आल्याचा हा प्रकार मंगळवारी घडला असून, शाळेतील भोजनात विद्यार्थ्यांना ही खिचडी देण्यात आली; मात्र, सुदैवाने ही खिचडी खाल्लेल्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास झाला नाही. दुस-या दिवशी या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर पालकांनी एकत्र येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. 

आष्टी शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला ही सर्वात जुनी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत ७०० ते ८०० विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मंगळवारी दुपारी दोन वाजता शाळेत नेहमीप्रमाणे पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. खिचडीत वापरण्यात आलेल्या वाटाण्याला सोनकिड्यांचा प्रादूर्भाव झाल्याचे लक्षात येवून देखील अन्न शिजविणा-या महिलांनी याच किडमिश्रित वाटाण्याची खिचडी तयार करून तिचे वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या या खिचडीत किडे असल्याचे काही वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती खिचडी न खाता ती पालकांना दाखविण्यासाठी घरी आणल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुस-या दिवशी सकाळी पालकांनी शाळेत जावून शिक्षकांना या प्रकाराचा जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य व अध्यक्षांना पाचारण करून आक्रमक पालकांनी पोषण आहार शिजविणा-या महिलांसह पोषण आहाराची जबाबदारी सांभाळणा-या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. धान्य पुरवठा करणा-या कंत्राटदाराने सव्वा महिन्यापूर्वी १८५ किलो वाटाण्याचा पुरवठा केला असून यातील काही वाटाण्याच्या गोण्यांमध्ये सोनकिडीचा प्रादूर्भाव झाला असून किडीचा प्रादूर्भाव झालेल्या वाटाण्याच्या गोण्या बाजूला ठेवल्याचे शिक्षकांनी या वेळी पालकांना सांगितले. पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. 

ठेकेदारांसह दोषींवर कारवाई करावी

शाळांना पोषण आहार बनविण्यासाठी दर्जाहिन निकृष्ट साहित्याचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे धान्य लवकर खराब होते. त्यामुळे शाळांना साहित्याचा पुरवठा करणा-या ठेकेदारांसह या मधील दोषींवर कारवाई करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ठराव घेण्यात येणार असून कारवाईची मागणी करणार आहे. असे डाॅ. नदीम शेख, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments