राजेंद्र जैन / कडा - तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात पोलिसांची नजर चुकवून गावठी दारु बनविण्याच्या अड्ड्यावर पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस दारुबंदी पथकाने शनिवारी छापा मारून हातभट्टी तयार करण्यासाठीचे तीन हजार लिटर रसायन व साहित्य असा एक लाखाचा मुद्देमाल नष्ट केला असून, यापुढे हातभट्टी दारुवर महिला पोलिस दारुबंदी पथकाची नजर असणार आहे.
आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात मागील काही दिवसापासून पोलिसांना चकवा देऊन गावठी दारु तयार करण्याचा अड्डा चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोनि संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी महिला दारुबंदी पथकाने पारगाव जोगेश्वरी येथे गावठी दारु तयार करणा-या अड्ड्यावर छापा मारून तीन हजार लिटर रसायन व साहित्य असा जवळपास एक लाखाचा मुद्देमाल नष्ट केला. अशी माहिती पोनि खेतमाळस यांनी दिली. सदर कारवाई पोलिस हवालदार राजेंद्र काकडे, उदावंत, संतोष दराडे, पोशि राऊत यांच्यासह महिला दारुबंदी पथक अंमलदार श्रीमती घुले यांनी केली. आष्टी तालुक्यात यापुढे हातभट्टी दारु तयार करण्याच्या अड्ड्यावर वर महिला पोलिस दारुबंदी पथक करडी नजर ठेवणार असल्याचे पोनि खेतमाळस यांनी सांगितले.
-----
0 Comments