कडा / वार्ताहर - आष्टीसह नगर, औंरंगाबाद जिल्ह्यात घरफोडी, चोरी खुन, दरोडा इत्यादी गंभीर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले (वय-२८) हा आष्टी तालुक्यात आल्याची गोपनीय खबर पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसा पथकाने लवाजम्यासह शिराळ परिसरातील शेतात सिनेस्टाईल सापळा लावून दोन साथीदारांसह त्याच्या मुसक्या आवळून धारदार शस्त्रांसह एक पिस्टल, कटावणी त्याच्याकडून हस्तगत करुन गजाआड केले. त्यामुळे आष्टी पोलिसांच्या या साहसी कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बेलगांव येथील रहिवाशी आटल्या ईश्वर भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जवळपास शंभर ते दीडशेच्या आसपास गंभीर गुन्हे आहेत. आष्टीसह अहमदनगर, पुणे, बीड, सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा इत्यादी जिल्ह्यात त्याची मोठी दहशत होती. तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता. खून, दरोडा, जबरी व दिवसा घरफोडी करण्यात तो मास्टर माईंड होता. मागील चार वर्षापासून पोलिसांना चकवा देत तो फरार असल्यामुळे पोलिस त्याच्या मागावरच होती. शरीराने आडदांड असलेला आटल्या ताकतीच्या जोरावर गंभीर गुन्हे करुन पोबारा करायचा. यापुर्वी त्याच्यावर दोनदा मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अल्पवयीन असल्याने त्याला पुण्याच्या बालसुधार गृहात ठेवले. तेथूनही त्याने पलायण केले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक सय्यद शौकतअली यांनी चार वर्षापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातून त्याला जेरबंद केले होते. त्यानंतरही पुन्हा तो पसार झाला. मागील चार वर्षापासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा ताकदीनिशी त्याच्या मागावर असतानाच, कुख्यात दरोडेखोर आटल्या हा रविवारी रात्रीच्या सुमारास आष्टी तालुक्यातील शिराळ परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय खबर पोनि संतोष खेतमाळस यांना मिळाली. त्या महितीच्या आधारे रविवारी रात्री आष्टी पोलिसांच्या पथकाने लवाजम्यासह शिराळ परिसरात शेतामध्ये सिनेस्टाईल सापळा लावून आटल्यासह हुम्या उर्फ हेमराज काळे, युवराज उर्फ धोंड्या ईश्वर भोसले या तिघांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून धारदार शस्त्रांसह कटावणी, एक पिस्टल हस्तगत करुन गजाआड केले आहे. या पोलिसांच्या साहसी कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
या कारवाईत पो नि संतोष खेतमाळस, सपोनि विजय देशमुख, भाऊसाहेब गोसावी, पोउपनि धनवडे, प्रविण क्षिरसागर, पोशि संतोष दराडे, सय्यद मजहर, सद्दाम शेख, पवळ, दीपक भोजेसह दंगल नियंत्रक पथकातील कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक पांडकर, उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी आष्टीच्या पोलिस अधिका-यांसह कर्मचा-यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
------%%-------
पीआय खेतमाळस यांची साहसी कारवाई -
एक महिन्यापुर्वी आष्टी पोलिस ठाण्याचा पदभार घेतलेले पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी ठाण्यांतर्गत सामाजिक स्वास्थ व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कायद्याचा दंडूका उगारल्यामुळे बेकायदेशीर कृत्य करणा-यांची चांगलीच पाचावर बसली आहे. एकाच महिन्यात आटल्या सारख्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळून खेतमाळस यांनी पहिलीच साहसी कारवाई केली. त्यामुळे त्यांच्यासह टिमचे नागरीकांतून जोरदार स्वागत होऊ लागले आहे.
एसपींकडून कौतुकाची थाप.... मागील चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले यांस पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस व त्यांच्या टिमने दोन साथीदारांना नुकतेच सिनेस्टाईल गजाआड केले. त्याबद्दल पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आष्टीच्या टिमचे विशेष कौतुक करुन पंचवीस हजारासह बक्षीसपत्र देऊन सन्मान केला आहे.
0 Comments