आष्टी तालुक्यातील कडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज व गोळीबार करणा-या राज्य सरकार व प्रशासनाच्या निषेधार्थ गुरुवार दि. ७ सप्टेेंबर रोजी सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जवळपास तासभर चक्का-जाम आंदोलन करण्यात आले. तसेच मनोज जरांगे-पाटील यांना पाठींबा देत सरकारने मराठा आरक्षणासाठी आता अंत पाहू नये. अशी हाक देत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे... अशा घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची जोरदार मागणी सकल मराठा आंदोलकांकडून करण्यात आली. याप्रसंगी महसूल विभागाचे मंडळाधिकारी वर्धमान देवधरे, सपोनि विजय देशमुख, तलाठी जगदीश राऊत यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. चक्काजाम आंदोलनात सर्वधर्मीय नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लवकरात लवकर न्याय द्यावा !
मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने आरक्षणा संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या मराठा बांधवांना न्याय द्यावा असे रमजानभाई तांबोळी, सभापती, कडा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सरसकट आरक्षण द्यावे !
निष्पाप आंदोलकांवर लाठीचार्ज करणा-या प्रशासनातील दोषींवर कारवाई करुन आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे असे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ यांनी सांगितले.
0 Comments