पाथर्डी – आगामी
शारदीय नवरात्र महोत्सव निर्विघ्नपणे संपन्न व्हावा तसेच मोहटा गडावर येणाऱ्या भाविकांना
वाहतूक कोंडी शिवाय पोहचता यावे यासाठी रस्त्याच्या कडेचे अतिक्रमणे हटवण्याचा तसेच
देवीच्या मिरवणुकीसह ईतरही कार्यक्रमात डी.जे वाद्य वाजवण्यास तसेच डोळे दिपवणाऱ्या
एल.ई.डी. रोषणाईस मनाई करण्याच्या तसेच देवी समोर सर्वजण समान असल्याचे तत्व बाळगत
नवरात्र कालावधीत व्ही.आय.पी भाविकांना मोहटादेवी मंदिर गाभाऱ्यातील दर्शनावर बंदी
करण्याच्या आदर्श निर्णयाने मोहटा देवस्थान नवरात्र महोत्सव यात्रा आढावा बैठक जिल्धाधिकारी
सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षीतेखाली संपन्न झाली.
जिल्हधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलीस
अधीक्षक राकेश ओला यांनी दर्शन मार्गाची गडाच्या पायथ्यापासून पाहणी केली व
देवस्थान समितीला याबाबत सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग ६१ ते शासकीय तंत्र
निकेतन विद्यालय रोड पर्यंतच्या रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडले असून ते बुजवण्याची
मागणी बैठकीत करण्यात आली. सदरील रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून त्यास
निधी मिळण्यात अडचणी असल्याचे जिल्हा परिषदे कडून सांगण्यात आले मात्र
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष
येरेकर यांच्याशी बोलून निधी उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन
दिले. भाविकांची होणारी उच्चांकी गर्दी लक्षात घेता महामंडलाच्या १०० बसेस
पुरवण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक पटेल यांनी सांगितले तर विद्युत
मंडळाच्या वतीने नवरात्र काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक
दुरुस्त्या करण्यात आल्याचे सांगितले. भाविकाकडून वन हद्दीत अतिक्रमणे तसेच
वनसंपदेची नासधूस थांबवण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण
साबळे यांनी सांगितले.
याशिवाय पिण्याचा पाण्याचा तुटवडा होवू नये म्हणून ५० टकर पुरवठा खेपा देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी सांगतले. आपत्कालीन आरोग्य समस्या उद्भवल्यास दोन रुग्णवाहिका तसेच दोन वैद्यकीय पथके तैनात करणार असल्याचे भगवान दराडे यांनी सांगितले. पाई येणाऱ्या भाविकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी देवराई ते तिसगाव तसेच चिंचपूर रोड ते मोहटादेवी गड पर्यंतची खड्डे बुजवण्याच्या सूचना अभियंता संध्या पवार यांना देण्यात आल्या आहेत. पाथर्डी शहरातील अतिक्रमणामुळे होणारी वाहतुक कोंडी थांवण्यासाठी अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या बैठ्कीदरम्यान पालिका प्रशासन व पोलीसाना दिले आहेत. सर्व विभागांचे समन्वय साधून भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनास व देवस्थान समितीला दिले आहेत.अन्न सुरक्षा विभागा मार्फत भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या प्रसादांची तपासणी करण्यात यावी,तसेच भेसळयुक्त पेढे,खवा विक्री करणार्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांना दिले आहेत. वाहतूक कोंडी थांबवन्यासाठी बस पहिल्या कमानी जवळ उभ्या करण्यात याव्यात अश्या सूचना यावेळी संबधिताना करण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धीराम सालीमठ,पोलीस अधीक्षक राकेश ओला,मोहटा देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी,उपविभागीय अधिकारी प्रसाद मते,पाथर्डी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार, शेवगाव पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी जगदीश पालवे,पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे,वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे,राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी संध्या पवार,सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता वसंत बडे,तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन दरंदले,अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार,विद्युत वितरणचे अभियंता संजय जाधव यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.आढावा बैठकीचे प्रास्ताविक मोहटा देवस्थान मुख्याधिकारी सुरेश भणगे यांनी तर आभार विश्वस्त डॉ श्रीधर देशमुख यांनी मानले.
0 Comments