आष्टी तालुक्यात धाब्यावर बनावट दारुची सर्रास विक्री

राजेंद्र जैन /कडा -तालुक्यात आरोग्यास घातक ठरणा-या बनावट दारुची हाॅटेल, धाब्यावर विनापरवाना बेकायदेशीर विक्री होत असतानाही पोलिस प्रशासनासह दारुबंदी व उत्पादन शुल्क विभाग या धंद्यांकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत असल्याने हा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने धाब्यावरील अवैद्य दारु विक्री तात्काळ बंद करावी. अशी मागणी आष्टी तालुका परमिट रूम व बार असोसिएशनने प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.   

आष्टी तालुका बार असोसिएशनने याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आष्टी कड्यासह अंभोरा परिसरात हाॅटेल, धाब्यावर ठिकठिकाणी विनापरवाना अवैद्य दारुची राजरोसपणे विक्री करण्याचा धंदा जोरात चालू आहे. आष्टी तालुक्यात बाहेरुन चोरट्या मार्गाने अधिक नफा देणारी बनावट दारु मोठ्या प्रमाणात येत आहे. मद्याच्या विविध बँडेड कंपन्यांच्या नावाने आरोग्यास हानिकारक ठरणारी बनावट दारुची हाॅटेल, धाब्यावर विनापरवाना अवैद्यरित्या विक्री करण्यात येत आहे. सदर दारु विक्रीतून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही, दारुबंदी व उत्पादन शुल्क विभाग या अवैद्य धंद्यांकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रशासनाने हाॅटेल धाब्यावरील विनापरवाना अवैद्य दारु विक्री करण्याचा धंदा त्वरीत बंद करावा. अशी मागणी आष्टी तालुका परमिट रूम व बार असोसिएशनने प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

मोठं घर अन् पोकळ वासा...?

  • दारुबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे या परिसरातील धाब्यावरील विनापरवाना दारु विक्रेत्यांमुळे परवानाधारक परमिट रूम व बार चालकांची अवस्था म्हणजे "मोठं घर अन् पोकळ वासा" अशीच झाली. त्यामुळे काहींना तर अक्षरश: परमिट बार मधून परवानगी नसतानाही लपूनछपून का होईना देशी दारुची विक्री करण्याची दुर्दैवी वेळ आल्याची काही परवानाधारकांत खाजगी चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments