सोशल मीडियाचा वापर जपून - धाराशिवकर

कडा / वार्ताहर- सोशल मीडियाचा वापर करताना तरुणांनी चुकीचे संदेश प्रसारित करु नयेत, या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित होऊन कुठेही शांततेला बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी केले. कडा येथील पोलीस चौकीमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.

पुढे बोलताना धाराशिवकर म्हणाले की, कडेकरांनी जपलेली सामाजिक एकोप्याची परंपरा कायम ठेवून शांतता ठेवावी. समाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश प्रसारित करणे किंवा स्टेटस् ठेवण्यावरुन वादविवादाचे प्रकार घडत असल्यामुळे पोलिस प्रशासन सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे तरुणांनी चुकीच्या संदेशातून समाजात एकमेकांच्या भावना दुखवणार नाहीत, शांततेला बाधा येणार नाही. याची समाजातील प्रत्येक घटकाने काळजी घ्यावी. या माध्यमातून कुणी सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस प्रशासनाकडून त्या व्यक्तिवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देतानाच, समाज हा पोलिसांचा डोळा, कान असल्यामुळे समाजात काही चुकीचे घडणार असेल तर नागरीकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन धाराशिवकर यांनी केले. तर सपोनि विजय देशमुख यांनी चोरीचे प्रकार रोखण्यासाठी गावात प्रमुख मार्गावर, चौकात सीसीटीवी बसवावेत, अल्पवयीन मुलांना पालकांनी दुचाकी वाहने देऊ नयेत, नसता त्यांच्या पालकांना पोलिसी कारवाईला जावे लागेल. तसेच शाळा, महाविद्यलयाच्या परिसरात ट्रीपलसीट दुचाकीवर धुमस्टाईल स्टंटबाजी करणा-यांर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या. मात्र रस्ता वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारा पकडल्यावर गाव पुढा-यांनी त्याला सोडण्यासाठी पोलिसांना फोन करू नयेत. असेही सपोनि देशमुख म्हणाले. याप्रसंगी पोउपनि अजित चाटे, अनिल ढोबळे, सरपंचपूत्र युवराज पाटील, ग्रा प सदस्य बंडू सय्यद, बिपीन भंडारी, महंमद सय्यद, रमेश शिरोळे यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments