राजेंद्र जैन / कडा - अवकाळी पावसाने डिसेंबर महिन्यात दाखवलेल्या तडाख्याने भाजीपाला पिकाचे देखील नुकसान झाले होते . त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडल्याचे चित्र कडा येथील आठवडी बाजारात रविवारी दिसून आले. संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगीला केल्या जाणा-या भाजीला यावर्षी मात्र महागाईची चांगलीच फोडणी बसली असल्याचे जाणवले.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी विविध भाज्या एकत्र करून त्यापासून बनवलेली भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. या दिवशीही भाजीसोबत बाजरीची भाकरी आवडीने खाल्ली जाते . ग्रामीण भाषेत या भाजीला खेंगट असे म्हटले जाते. तर हॉटेलमध्ये याच भाजीचे स्वरुप मिक्स व्हेज म्हणून परिचित आहेच. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक भाजीपाला, फळभाज्या यांच्या किमतीमध्ये साधारण दुपटीने वाढ झाली आहे. सर्वात जास्त भाव लसनाला असून तीनशे रुपये किलो या दराने सध्या बाजारात लसूण विकला जातो. गवार देखील दोनशे रुपये किलो असून भेंडी, वांगे, वाल या भाज्यांनी शंभरी गाठली आहे. हिवाळ्यामध्ये वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी याला खवयांची पसंती असते. मात्र वांग्याचे भाव प्रथमच शंभराच्या घरात गेले आहेत. कोबी फ्लावर या नेहमी उपलब्ध असणाऱ्या फळभाज्या 30 ते 40 रुपये विकल्या जातात. मेथी, कोथंबीर सध्यातरी स्वस्त असून दहा रुपये जुडी असा सरासरी भाव आहे. अद्रकाचे भाव मात्र निम्म्याने कमी झाले. दोनशे रुपये प्रतिकिलो किलो विकले जाणारे अद्रक शंभर रुपये किलोवर आले. शेतकऱ्यांनी एकरभर एकच पीक करण्यापेक्षा त्यात चार-पाच गुंठे वेगवेगळा भाजीपाला पिकवला तर तो त्यांच्यासाठी आणि ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल असे मत जाणकारानी व्यक्त केले आहे.
---------%%--------
0 Comments