पाथर्डी-दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत असून पाण्याची गरज सुद्धा वाढीतली आहे. जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारित नव्या योजनेचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण होऊन शहरवासीयांना नियमित पाणी मिळू शकेल ,अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
शहरातील आनंदनगर, सावता नगर ,नाथ नगर, वामन भाऊ नगर ,आदी विभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष डॉ मृत्युंजय गरजे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नितीन एडके, जगदंब प्रतिष्ठानचे ऍड .प्रतिक खेडकर, वृद्धेश्वर चे संचालक राहुल राजळे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, पक्ष संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सुतार समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या विश्वकर्मा मंदिराच्या कामासाठी स्थानिक विकास निधीतून रक्कम उपलब्ध केल्याबद्दल समाजाच्या वतीने राजळे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजळे म्हणाल्या, शहरात विविध ठिकाणी विविध कारणांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या मोकळ्या भूखंडांवर काटेरी झुडपे अन्य प्रकारचा केरकचरा वाढला आहे. पालिकेने शहरातील सर्व खुल्या भूखंडांची त्वरित स्वच्छता करावी. जिल्हा नियोजन मंडळामार्फत पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांचीही विकास निधी मिळवून देण्यासाठी भरीव मदत झाली. ठेकेदारांनी सर्व कामे गुणवत्ता पूर्ण करावीत. निकृष्ट कामांच्या तक्रारी आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य वर्गासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर योजना जाहीर केल्या आहेत. विश्वकर्मा योजनेअंतर्गत बारा बलुतेदारांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ मिळवून द्यावा. शहर विकासासाठी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने विकास कामांना गती मिळाली. पाणी योजना, रस्त्यांची कामे, शासकीय इमारतींची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर चांगले यश येत आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातूनही चांगली कामे झाली आहेत. सेवाभावी कार्यकर्ता ही पक्षाची मोठी संपत्ती आहे. पुढील महिन्यात लोकसभेची आचारसंहिता जारी होऊ शकते. लोकसभेमध्ये पुन्हा भाजपचा खासदार निवडून द्यायचा आहे. यासाठी सर्वांनी अंग झटकून कामाला लागावे. देशात व राज्यात भाजपची सत्ता येणार असून विकास कामांसाठी आगामी काळात मोठा निधी मिळणार असल्याचे राजळे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन नागापुरे तर आभार भास्कर चन्ने यांनी मानले.
0 Comments