सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलिसांचा नागरीकांशी संवाद

 

अंभोरा पोलिसांनी उचलले नियोजनात्मक पाऊल !

राजेंद्र जैन / कडा- अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चो-या तसेच शाळा, महाविद्यालयीन मुलींची छेड काढणा-या टवाळखोरांना कायद्याचा धाक बसावा, याकरिता पोलिसांना तिसऱ्या डोळ्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. त्या अनुषंगाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनजागृतीसह, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटीवर पोलिसांकडून भर दिला जात आहे.

आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत ८३ गावांचा समावेश आहे. दिवसा होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, विद्युत मोटार चोरी, दुचाकी चोरी, जनावरं चोरी, शासकीय मालमत्तेचे नुकसान यांसह अनेक घटना घडत असतात. पोलिसांना तपास करताना अडचणी येतात. त्यामुळे अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दी मधील प्रत्येक गावात, मुख्य चौकात, रहदारीच्या ठिकाणी, मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर संभाव्य घटना टाळून तपास करणे पोलिसांना सोपे जाईल. विविध गावातील चौकात कॅमेरे बसवल्यास चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल. यासाठी पोलिसांना लोकसहभागाची गरज असून यासाठी ठाणेदारांकडून गावोगाव बैठकांसह जनजागृती मोहिम राबविली जात असून, या महत्वपुर्ण उपक्रमासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अंभोरा पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी, ग्रामपंचायतीने हातभार लावून आपले गाव व परिसर नजरकैदेत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या भेटी घेत आहेत.

Post a Comment

0 Comments