पाथर्डी -
अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत, महाराष्ट्राचे व मराठी मनाचे
मानबिंदू, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची
जयंती १९ फेब्रुवारी रोजी पाथर्डी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात
आली.
पाथर्डी शहरातील कसबा
विभागातील व पंचायत समिती येथील शिवरायांचा पुतळा परिसर आकर्षक फुलांनी सजवला
होता. पुतळ्यास सकाळी शिवप्रेमी तरूणांनी दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. दिवसभरात
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व शासकीय अधिकारी यांनी याठिकाणी पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नाईक
चौकात भव्य रक्तदान शिबीर व अवयवदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिव जयंती उत्सव समिती, ज्ञानेश्वर कोकाटे मित्र मंडळ, शिवनेरी तरुण मंडळ
यांच्या वतीने आंबेडकर चौकात व नाईक चौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. आंबेडकर
चौक व नाईक चौकात फुलांनी सजवलेल्या भव्य दिव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी
महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली होती. शिवजयंती निमित्ताने अवघे शहर
भगवामय झाले होते.
ओबीसी नेते दिलीपराव खेडकर
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूकी पंचायत समितीच्या आवारातील
शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून चौका चौकातील उत्सव समितीच्या शिवप्रतिमांना
पुष्पहार अर्पण करत कसबा पेठेतील शिवाजी पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीचा
समारोप करण्यात आला, शहरातील विविध शाळा महाविद्यालयात,
शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्सव साजरा झाला. बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
शहरातुन घोषणा देत भव्य बाईक रॅली काढत शिवरायांना अभिवादन केले. आमदार मोनिकाताई
राजळे यांनी कासार पिंपळगाव येथे प्रतिमा पूजन करून शिवरायांना अभिवादन केले.
माजी आमदार चंद्रशेखर घुले
यांनी ही आज शहरातील शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित
शिवप्रेमी नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक रामनाथ बंग
मित्र मंडळाच्या वतीने जय भवानी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत शिवजयंती निमित्ताने
शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. इंदिरानगर येथे सामाजिक कार्यकर्ते इजाजभाई शेख
मित्र मंडळ व मोरया प्रतिष्ठानने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते.
नाईक चौकात सायंकाळी उत्सव
समितीच्या वतीने डॉल्बी सिस्टीम डिजे व लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय
अशा घोषणा देत डीजेच्या तालावर ठेका धरला. तालुक्यातील करंजी, तिसगाव, मिरी, खरवंडी, कोरडगाव, टाकळीमानुर, चिंचपुर
आदी गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
0 Comments