ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रस्ता रोको !

 

पाथर्डी- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, ओबीसी समाजातील आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यात यावी या मागणीसाठी कीर्तन वाडी येथे ओबीसी बांधव प्रल्हाद कीर्तने यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते बारा वाजल्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर रास्ता रोको करण्यात आला होता.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये तसेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 14 फेब्रुवारी पासून किर्तन वाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणादरम्यान प्रल्हाद कीर्तने यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर रास्ता रोको केला.

यावेळी ओबीसी नेते दिलीप खेडकर,जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप, भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष माणिक खेडकर, आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, महारुद्र कीर्तने, दादासाहेब खेडकर, नागनाथ गर्जे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधवांनी तीव्र शब्दात सरकारचा निषेध व्यक्त करत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये अन्यथा ओबीसी समाज येथे निवडणुकीत सरकारला मतपेटीतून जागा दाखवून देईल असा इशारा दिला. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता मात्र महसूल प्रशासनाचा जबाबदार अधिकारी आंदोलन ठिकाणी वेळेत आला नाही त्यामुळे आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर टायरची होळी केली त्यामुळे आंदोलनास उग्र स्वरूप आले दोन तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच नायब तहसीलदार बागुल यांनी आंदोलकांच्या भावना समजावून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची आश्वासन दिल्याने तात्पुरत्या स्वरूपात रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र उपोषण करती प्रल्हाद कीर्तने यांनी त्यांची उपोषण सुरूच ठेवले असल्याने येत्या काही दिवसात हे आंदोलन पुन्हा उग्ररूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Post a Comment

0 Comments