पाथर्डीतून ओबीसी मेळाव्याला मोठी गर्दी..


पाथर्डी प्रतिनिधी:- आज नगर येथे मंत्री छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी पाथर्डी तालुक्यातील हजारों ओबीसी बांधव ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत व एकच पर्व ओबीसी सर्व.., हर रोज मातीसाठी, एक दिवस जातीसाठी.. अशा प्रकारे जोरदार घोषणाबाजी करत दुपारी मेळाव्याला रवाना झाले. 

     दुपारी नगरला रवाना होण्यापूर्वी शेकडो ओबीसी बांधवांनी विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले. नायब तहसीलदार श्री बागुल यांनी निवेदन स्वीकारले. 
 या निवेदनावर दिलीप खेडकर, अरविंद सोनटक्के, किसन आव्हाड, सुहास उरणकर, हरिहर गर्जे, आदिनाथ महाराज आंधळे, सुभाष भडके, रघुनाथ बनसोडे, ज्ञानदेव वाघमारे, संदीप दुधाळ, राजेंद्र बेंद्रे रोहिदास पवार आदींच्या सह्या आहेत. 
  या निवेदनात म्हटले आहे की, गोरगरीब, मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे परंतु ते ओबीसी कोट्यातून न देता स्वतंत्रपणे देण्यात यावे. मराठा आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गावर अन्याय करू नये. राज्य सरकारने मागील २६ जानेवारी रोजी जो अध्यादेशाचा मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी दाखले देत ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाने ओबीसी प्रवर्गा मधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सकल ओबीसी व भटके विमुक्त याबाबत संताप व्यक्त करत आहेत. ओबीसी समाजाला फसवण्याचे काम राज्य सरकार करत असून हे काम ओबीसी समाज कधीही होऊ देणार नाही. राज्य सरकारचा हा निर्णय मूळ ओबीसी वर अन्याय करणार आहे. तरी राज्य शासनाने सदर निर्णय रद्द करावा, बेकायदेशीर शिंदे समिती, मागासवर्ग आयोग यांचे सर्वेक्षण थांबवावे व ओबीसींवर अन्याय करू नये. निवेदनात विविध तीन ठराव मांडण्यात आले आहेत.   
दरम्यान आज नगर येथे होणाऱ्या या मेळाव्यासाठी पाथर्डी तालुक्यातील शेकडो वाहनांनी हजारों ओबीसी बांधव सकाळपासूनच नगर कडे रवाना झाले. वाहनांना पिवळे झेंडे, गळ्यात पिवळे उपरणे, विविध जाती जमातीच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करत वाजत गाजत निघाले होते. यासाठी एल्गार मेळावा नियोजन समितीने मोठे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments