सुवर्णयुग तर्फे वनदेव परिसरात वन्यजीवांसाठी पाणीपुरवठा !

पाथर्डी  - उन्हाची तीव्रता वाढत असून पशुपक्षी, वन्यजीवांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. घरावरील छत, सार्वजनिक उद्यान, मैदानांवर अथवा झाडांना टांगून कुंड्यांमधून पाणी ठेवावे.पर्यावरण रक्षणासाठी पशुपक्षी, प्राणी व झाडझुडपे वाचली पाहिजेत, अशा सेवेत ईश्वरी शक्तीच्या अविष्काराची अनुभूती मिळते. अशी माहिती जनता दलाचे ज्येष्ठ नेते भगवान बांगर यांनी दिली.               

सुवर्णयुग मंडळाच्या वतीने वनदेव निसर्ग परिसरात सलग बारा वर्षांपासून वन्यजीवांसह पशुपक्षी व अन्य भटक्या प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पानवठे भरून पाणी उपलब्ध करून दिले जाते. आगामी चार महिने अशी सेवा लोक सहभागातून चालवली जाईल. शंभर एकराहून अधिक जागेवर वनक्षत्र असून या परिसरात हरीण, ससे, तरस, लांडगे, कोल्हे, मुंगूस, साप, नाग असे विविध वन्यजीव वावरतात. भटकी जनावरे सुद्धा चाऱ्याच्या शोधार्थ फिरून परिसरातील पशुपालक शेळ्या व अन्य जनावरे चारण्यासाठी या भागात असतात. शहरालगतचा हा परिसर शहरवासियांचे फिरण्याचे आवडीचे स्थान असून बालोद्यानांमध्ये सायंकाळी बालकांची गर्दी वाढते. याच डोंगर परिसरात वनदेव महादेवाचे अत्यंत जागृत स्थान असून नियमित दर्शनासाठी भाविक येतात. सलग बारा वर्षे अशी सेवा करणारे सुवर्णयुग मंडळ जिल्ह्यातील एकमेव सेवाभावी मंडळ ठरले आहे. 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे, मुकुंद लोहिया, डॉ. अभय भंडारी, मुख्य संयोजक अभय गांधी, ओम प्रकाश दहिफळे, व्यापारी संघटनेचे उमेश रासने, सुवर्णकार मंडळाचे सचिव योगेश घोडके वनरक्षक एकनाथ खेडकर आदींसह विविध मंडळाचे पदाधिकारी सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघासह वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना बांगर म्हणाले, मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद लाखमोलाचा असून यामुळे सर्वांच्या मनामध्ये सेवेचा संस्कार घडतो. अनेक नागरिक अन्नधान्य घेऊन दररोज या परिसरात पाखरांना टाकतात. विविध प्रकारच्या अध्यात्मिक व सेवा कार्यामुळे हा संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला आहे.  विविध पाणवट्यांमध्ये एक टँकर पाणी दोन दिवस पुरते. वनविभागाने माती परीक्षण व पुनर्भरण करून वृक्ष संवर्धन करण्याची गरज आहे. शुद्ध प्राणवायूचा प्रचंड खजिना या परिसरात असून वनदेव परिसर म्हणजे शहराचे वैभव आहे. लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने संयुक्तपणे विकास आराखडा अमलात आणावा, असे बांगर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय गांधी तर आभार मुकुंद लोहिया यांनी मानले. यावेळी टँकर सेवा पुरवणाऱ्या चालक व मालकाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


 

Post a Comment

0 Comments